वाडा/पालघर (डॉ. दिपेश पष्टे)
वाडा तालुक्यातील कुडूस हे वाढत्या रहदारीचे आणि औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असूनही येथील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. कुडूस पोलीस ठाण्याची मंजुरी मिळूनही अद्याप ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेले नसून सध्या केवळ दोनच कर्मचारी कर्तव्यावर असल्याची परिस्थिती आहे.कुडूस परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहती असून बाहेरील राज्यांतील कामगारांची वर्दळ मोठी आहे.
गेल्या काही दिवसांत चोरी, घरफोडी, मारामारी यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.काही महिन्यांपूर्वी वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले कुडूस दुरक्षेत्र स्वतंत्र पोलीस ठाणे म्हणून मंजूर करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात मनुष्यबळाची कमतरता असल्याने हे ठाणे अजूनही पूर्णपणे कार्यान्वित होऊ शकलेले नाही. सध्या येथे फक्त दोनच कर्मचारी तैनात असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
नागरिक तक्रार नोंदवण्यासाठी आल्यास संबंधित कर्मचारी 112 आपत्कालीन कॉलवर किंवा गस्तीवर गेल्यास तासनतास वाट पाहावी लागते. परिणामी, अनेकांना तक्रारींसाठी वाडा पोलीस ठाण्याकडे जावे लागते.
पोलीस दलातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वाहतूक कोंडी, गुन्हेगारी आणि इतर तक्रारी वेळेत निकाली निघत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “अजून किती वर्षे कुडूस पोलीस ठाणे पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची वाट पाहावी लागणार?” असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.दरम्यान, प्रशासनाने तातडीने आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून कुडूस पोलीस ठाणे कार्यान्वित करावे, अशी मागणी जोर धरत आहे.









