मिठाईची गुणवत्ता, वजनकाटा व बाजारभावाबाबत व्यापाऱ्यांना समज; फसवणूक झाल्यास कारवाईचा इशारा
कुडूस : गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांसाठी आकर्षण ठरलेली कुडूस येथील उरूस बाजारपेठ सध्या पुन्हा गजबजली असून लग्नसराईनंतर पावसाळ्यापूर्वी भरणाऱ्या या बाजारात नाशिक, घोटी, इगतपुरी, लासलगाव आदी भागांतून मोठ्या प्रमाणात व्यापारी दाखल झाले आहेत. ग्रामपंचायत हद्दीत सुरू झालेल्या या बाजारपेठेत विविध वस्तूंसह मिठाई विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.
मात्र विक्री सुरू होताच वजनकाट्यातील त्रुटी, मालाची गुणवत्ता तसेच मिठाईच्या दर्जाबाबत ग्राहकांच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. नारे गावातील नागरिक सुरेश पाटील यांनी उरूसातून बेसन वडी खरेदी केली होती. घरी गेल्यानंतर त्यांच्या लहान मुलीने ती मिठाई खाल्ली असता त्यामध्ये मण्यांसारखी रंगीत वस्तू आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. सदर बाब कुडूस परिसरातील सोशल मीडियाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल झाल्यानंतर याची गंभीर दखल घेण्यात आली.आपले मानवाधिकारचे संचालक डॉ. दिपेश पष्टे यांनी तातडीने पोलिसांना तोंडी माहिती दिली. त्यानंतर हर्षल देसले (अध्यक्ष – व्यापारी संघटना), दिवेश पष्टे (अन्न तंत्रज्ञ), सचिन भोईर (अध्यक्ष – कुडूस तंटामुक्ती), तसेच स्थानिक नागरिक सुरेश पाटील यांच्यासह संबंधित मिठाई दुकानाला भेट देऊन प्रत्यक्ष चौकशी करण्यात आली.
तपासणीदरम्यान संबंधित पदार्थ हे मणी नसून खाण्यायोग्य सजावटीचे घटक असल्याचे स्पष्ट झाले. मात्र असे पदार्थ लहान मुलांसाठी घातक ठरू शकतात, असे निदर्शनास आणून देत व्यापाऱ्यांना अशा प्रकारच्या वस्तूंची विक्री टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच कोणतेही नवीन खाद्यप्रकार अधिकृत परवानगीशिवाय विक्रीस ठेवू नयेत, असा इशाराही देण्यात आला.
याचवेळी दुकानातील डिजिटल वजनकाट्यावर आधीच १२० ग्रॅम वजन दिसत असल्याचे डॉ. दिपेश पष्टे यांच्या निदर्शनास आले. याबाबत विचारणा केली असता “चार्जिंग जास्त झाल्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली,” असे दुकानातील कामगाराने सांगितले. मात्र ग्राहकांची फसवणूक झाल्यास दुकान बंद करून कठोर कारवाईची मागणी करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.
तसेच सर्व व्यापाऱ्यांनी बाजारभाव दर्शनी भागात लावावेत, वजन व मापे अचूक ठेवावीत, खाण्याचे पदार्थ झाकून ठेवावेत, तसेच विक्री करताना हातात ग्लोज आणि डोक्यावर टोपी वापरावी, अशा सूचना व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हर्षल देसले व तंटामुक्ती अध्यक्ष सचिन भोईर यांच्या माध्यमातून देण्यात आल्या.सामान्य गोरगरीब ग्राहकांची फसवणूक होऊ नये आणि बाजारपेठेवरील नागरिकांचा विश्वास कायम राहावा, यासाठी पुढील काळातही अशा तपासण्या सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.








