Homeव्यापार / उद्योगअविश्वास ठराव फेटाळला; प्रा. धनंजय पष्टे पुन्हा चेअरमनपदी !

अविश्वास ठराव फेटाळला; प्रा. धनंजय पष्टे पुन्हा चेअरमनपदी !

चिंचघर सोसायटीच्या विशेष सभेत बहुमताचा निर्णय

वाडा (प्रतिनिधी): वाडा तालुक्यात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या चिंचघर शेतकरी सेवा सहकारी सोसायटीमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. चेअरमन प्रा. धनंजय पष्टे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव सहाय्यक निबंधक कार्यालयाने फेटाळून लावला असून मानसिक दडपणाखाली दिलेला त्यांचा राजीनामा देखील अमान्य ठरवण्यात आला आहे. यामुळे १३ मार्च रोजी झालेल्या विशेष सभेत बहुमताने प्रा. धनंजय पष्टे यांना पुन्हा चेअरमनपदी पूर्ववत करण्यात आले. ही विशेष सभा सोसायटीचे उपाध्यक्ष मंगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या निर्णयामुळे सोसायटीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचे बोलले जात आहे.

चिंचघर, बिलावली, सापरोंडे, खरीवली, पष्टेपाडा, विजयगड, डोंगस्ते, कोलेकर पाडा, घोडविंदेपाडा आणि पाटील पाडा या गावांचा सोसायटीच्या कार्यक्षेत्रात समावेश आहे. संस्थेचे एकूण १३ सदस्य असून दोन तज्ज्ञ सदस्यांसह सदस्यसंख्या १५ आहे. आज झालेल्या विशेष सभेला १० सदस्य उपस्थित होते. उपस्थित सदस्यांनी बहुमताने प्रा. धनंजय पष्टे यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत त्यांना चेअरमनपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या सभेसाठी सोसायटीचे सर्वच गावातून मोठ्या संख्येने सभासद देखील बाहेर उपस्थित होते. ज्यांनी खोडसालपणा केला ते संचालक सभेला उपस्थित राहिलेच नाहीत. शेतकरी सभासदांनी सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. अविश्वास ठराव मांडणारे गोविंद पाटील आणि रोहिदास पाटील यांच्यावर संस्थेमार्फत योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सदस्यांनी सभेत केली असून या प्रकरणाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

 संस्थेची पार्श्वभूमी

१९५९ च्या सुमारास दानपत्राद्वारे मिळालेल्या जागेवर सोसायटीची एक जुनी इमारत होती. अनेक वर्षे ती वापरात नसल्यामुळे सोसायटीचे कार्यालय कुडूस येथे भाड्याने चालवावे लागत होते. यानंतर काही संचालकांनी पुढाकार घेत नवीन इमारत उभारण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला या निर्णयाला विरोध झाला असला तरी धनंजय पष्टे, नंदकुमार पाटील आणि मंगेश पाटील यांनी पुढाकार घेत निधी उभारला.

माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या निधीतून तसेच वर्गणी आणि देणगीच्या माध्यमातून निधी उभारण्यात आला. त्यातून पालघर जिल्ह्यात अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असे वातानुकूलित कार्यालय उभारण्यात आले असून ते शेतकरी सदस्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

उपाध्यक्षांचा सन्मान

दरम्यान भारतीय जनता पार्टीकडून पालघर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सोसायटीचे उपाध्यक्ष मंगेश दत्तात्रेय पाटील यांचा सभेत पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.

RELATED ARTICLES

Most Popular