इन्स्ट्रुमेंट पॅनलवरील ‘वॉर्निंग लाईट’मुळे पायलटचा तत्पर निर्णय; सर्वजण सुरक्षित
पालघर, दि. ११ फेब्रुवारी : सफाळा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे केळवा रोड, रावळेपाडा येथील विद्यावैभव शाळेच्या मैदानावर एका खासगी हेलिकॉप्टरचे आपत्कालीन सुरक्षित लँडिंग करण्यात आले. इन्स्ट्रुमेंट पॅनलवर अचानक ‘वॉर्निंग लाईट’ सुरू झाल्याचे लक्षात येताच पायलटने तत्परता दाखवत हेलिकॉप्टर खाली उतरविले. या घटनेत कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली नाही.
जुहू (मुंबई) येथून सुरत (गुजरात)कडे सराव उड्डाणासाठी निघालेले युनाटेड हेलीचार्टर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे हेलिकॉप्टर दुपारी सुमारे १२.०५ वाजता केळवा रोड परिसरावरून जात असताना इन्स्ट्रुमेंट पॅनलमध्ये तांत्रिक बिघाडाची सूचना देणारी लाईट दिसू लागली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पायलट कॅप्टन देवाशीश होता यांनी रावळेपाडा येथील विद्यावैभव शाळेच्या मैदानावर तातडीने सुरक्षित लँडिंग केले.
हेलिकॉप्टरमध्ये कॅप्टन देवाशीश होता , चेक पायलट कॅप्टन आर. एस. यादव, मेंटेनन्स इन्स्पेक्टर सत्यनारायण शर्मा तसेच मेंटेनन्स इन्स्पेक्टर अविनाश वरुण प्रवास करत होते.
लँडिंगनंतर पायलट व तांत्रिक पथकाने तत्काळ तपासणी केली. प्राथमिक चाचणीत कोणताही गंभीर बिघाड नसल्याची खात्री झाल्यानंतर संबंधितांनी जुहू येथील मुख्य कार्यालयाशी संपर्क साधला.
तपासणीनंतर हेलिकॉप्टरने दुपारी १४.३५ वाजता पुन्हा उड्डाण केले. सुरतला न जाता खबरदारीचा उपाय म्हणून हेलिकॉप्टर पुन्हा जुहू, मुंबई येथे नेण्यात आले आणि ते १४.५५ वाजता सुरक्षितपणे पोहोचले, अशी माहिती पायलट कॅप्टन देवाशीश होता यांनी दिली.
सदर हेलिकॉप्टरचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत:
कंपनीचे नाव: युनाटेड हेलीचार्टर प्रायव्हेट लिमिटेड, जुहू, मुंबई
एअरक्राफ्ट सिरीयल नंबर: VP-UHE
कमाल वजन (MTOW): २२५० किलो
पत्ता: हॅंगर नं. सीर, जुहू सिव्हील एरोड्रोम, एअरपोर्ट एरिया, विलेपार्ले (प.), मुंबई – ४०००५६






