Homeव्यापार / उद्योगशेतकऱ्यांची दिवाळी अंधारमय; वादळी पावसाने पुन्हा उध्वस्त केली आशा!

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारमय; वादळी पावसाने पुन्हा उध्वस्त केली आशा!

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुसळधार पाऊस; भातपिकांचे प्रचंड नुकसान – शासनाच्या तुटपुंज्या मदतीवर शेतकऱ्यांचा संताप

वाडा/प्रतिनिधी

लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आणि शेतकऱ्यांच्या भातपिकाचे मोठे नुकसान झाले. दिवाळीच्या सणात आनंदाच्या दिव्यांऐवजी अनेक शेतकऱ्यांच्या घरात काळोख पसरला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या अवकाळी पावसामुळे वाडा, जव्हार, मोखाडा, विक्रमगड परिसरातील शेतकऱ्यांचे हजारो हेक्टरवरील भातपिक पूर्णपणे कोसळले आहे. काहींचे पीक तर पाण्यातच बुडाले असून हंगामातील सर्व मेहनत वाया गेली आहे.

शासनाने नुकसानभरपाई जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात काहींना फक्त ₹१२०० तर काहींना ₹२००० इतकीच मदत मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप उसळला आहे. “या पैशात आम्ही बी-बियाणं घेऊ का, की कुटुंब चालवू?” असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. शासन नुकसानभरपाई देते की भीक – असा सवाल गावागावांतून केला जात आहे.शेतकरी संघटनांनी तातडीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई, पीकविमा रक्कम आणि पुढील हंगामासाठी आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. शहरात दिवाळीचे दिवे झळकत असताना, मातीत जगणाऱ्या शेतकऱ्यांची दिवाळी मात्र यंदा अंधारमयच ठरली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular