उपराळे विभाग हायस्कूलमध्ये विज्ञान प्रयोगशाळा व ग्रंथालयाचे लोकार्पण; 420 विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप
विक्रमगड, दि. 25 जून 2026 :
उपराळे विभाग हायस्कूल, उपराळे (ता. विक्रमगड, जि. पालघर) येथे गुरुवार, 25 जून 2026 रोजी विज्ञान प्रयोगशाळा व ग्रंथालयाच्या उद्घाटनाचा भव्य सोहळा उत्साहात पार पडला. हा उपक्रम स्मिती सोशल फाउंडेशन, मुंबई आणि Rotary Club of Mumbai Juhu यांच्या संयुक्त सहकार्याने साकारण्यात आला.
या प्रकल्पांतर्गत शाळेला सुमारे ₹5 लाख खर्चाची अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, ₹26 हजार किमतीचे प्रयोगशाळेतील टेबल, ₹30 हजार किमतीची ग्रंथालयातील पुस्तके तसेच ₹35 हजार किमतीची पाच कपाटे उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार असून त्यांच्या ज्ञानवृद्धीस व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मोठी मदत होणार आहे.
यावेळी शाळेतील 420 विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. तसेच इयत्ता दहावीच्या 128 विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोग वह्यांचे वितरण करण्यात आले. या संपूर्ण उपक्रमामध्ये स्मिती सोशल फाउंडेशन, मुंबईच्या अध्यक्षा सौ. महाजन मॅडम यांचे विशेष योगदान लाभले असून त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
यापूर्वीही 28 मार्च 2026 रोजी सौ. महाजन यांच्या पुढाकारातून शाळेला 19 संगणक, साऊंड सिस्टिम, 40 खुर्च्या, प्रोजेक्टर तसेच Home Revise च्या माध्यमातून संपूर्ण अभ्यासक्रमाची शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या सातत्यपूर्ण मदतीमुळे उपराळे विभाग हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने मोठा आधार मिळत आहे.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शिक्षण क्षेत्रातील अशा सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत, समाजातील दानशूर संस्था व व्यक्तींनी शिक्षणाच्या उन्नतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीही या सुविधांचा योग्य वापर करून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्याचा संकल्प व्यक्त केला.








