Homeक्राईमअवैध दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीवर कारवाई; २०.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीवर कारवाई; २०.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त

मनोर पोलिसांची धडक कारवाई

पालघर, दि. ३ : पालघर जिल्ह्यातील अवैध दारू वाहतूक थांबविण्यासाठी करण्यात आलेल्या धडक मोहिमेत मनोर पोलिसांनी मोठी कारवाई करत एकूण ₹20,17,168/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून इतर तिघांचा शोध सुरू आहे.

अवैध धंदे रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना कडक सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार मनोर पोलीस ठाण्याचे पथक मुंबई–अहमदाबाद महामार्गावर पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास मौजे नांदगाव हद्दीत नांदगाव ओव्हरब्रिजजवळ लावलेल्या सापळ्यात टाटा कंपनीचा फिकट तांबूस तपकिरी रंगाचा टेम्पो (MH18-BH-7700) अडविण्यात आला. चालकाने आपले नाव किशोर भिका बावीसकर (वय ३९, रा. विक्रोळी, मुंबई) असे सांगितले.

वाहनाची तपासणी केली असता महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली दमण बनावटीची दारू मिळून आली. जप्त दारूची किंमत ₹10,17,168/- असून वाहनासह एकूण मुद्देमाल ₹20,17,168/- इतक्या किमतीचा आहे.चौकशीदरम्यान आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार ही दारू सिल्वासा येथील अमित कुमार शुक्ला पंडीत, गोरब गोसले मोनू आणि सुरज चौबे (पूर्ण माहिती उपलब्ध नाही) यांनी भरून दिली असून ती धुळे येथे पोहोचविण्याचे काम आरोपीकडे होते, असे समोर आले.

या प्रकरणी मनोर पोलीस ठाणे येथे गु.र. क्र. ३२४/२०२५ नुसार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(अ), ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी किशोर बावीसकर यास अटक करण्यात आली असून पुढील तपास पोउपनि संग्राम पाटील करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभा राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि रणवीर बयेस, पोउपनि सुभाष गोईलकर, पोउपनि संग्राम पाटील, पोना उदय चौधरी, पोना पिंटू फरारा, पोअं नागेश निळ (मनोर पोलिस ठाणे) यांनी संयुक्तरित्या केली.

RELATED ARTICLES

Most Popular