वाडा/प्रतिनिधी
वाडा बसस्थानक, समोरील दुकाने, वाडा बाजारपेठ तसेच कुडूस बसस्थानक व बाजारपेठ यासह इतर सार्वजनिक ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून सर्रास दारू पिऊन थांबणे, फिल्मी स्टाईलने सिगारेट ओढणे, मुली-महिलांशी असभ्य वर्तन करणे, शेरेबाजी करणे असे प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.
या प्रकारांवर तातडीने प्रतिबंध घालावा, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान व अशा प्रकारच्या वर्तनावर कडक कारवाई व्हावी, यासाठी क्रांतिज्योत सामाजिक संघटनेकडून वाडा तहसीलदार, वाडा पोलीस निरीक्षक व नगरपंचायत मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास कायद्याने बंदी असतानाही हे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यामुळे शालेय विद्यार्थी, महिला व सामान्य नागरिक त्रस्त होत असून, विशेषतः लहान मुलांवर त्याचा विपरित परिणाम होत आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष कल्पेश ठाणगे, उपाध्यक्षा मृणाली नडगे, माजी उपशिक्षणाधिकारी कृष्णा जाधव, ऍड. नितेश म्हसे यांसह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.