Homeमहाराष्ट्र राज्ययोग्य भाव न मिळाल्यास शेतकऱ्यांची दिवाळी प्रांत कार्यालयातच! — धर्मवीर संघटना

योग्य भाव न मिळाल्यास शेतकऱ्यांची दिवाळी प्रांत कार्यालयातच! — धर्मवीर संघटना

प्रशासन शेतकऱ्यांचा किती अंत पाहणार…

वाडा प्रतिनिधी / दि.१६

वाडा उपविभागीय कार्यालयासमोर धर्मवीर विचार मंच संघटना आणि शेतकऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा गेल्या नऊ दिवसांपासून सुरू आहे. मात्र या आंदोलनाकडे प्रशासनाने अद्यापही दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

वाडा, विक्रमगड आणि जव्हार तालुक्यातील अनेक गावांमधून टॉवर लाईन प्रकल्प जात आहे. या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला न मिळाल्यामुळे त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, जमीन मूल्य व नुकसानभरपाईचा दर अन्यायकारक असून, प्रशासनाकडून दरांमध्ये कोणताही बदल करण्यास नकार दिला जात आहे.

या पार्श्वभूमीवर धर्मवीर विचार मंच संघटनेचे मिलिंद पष्टे यांनी इशारा दिला आहे की,

“जर बाधित शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला नाही, तर आम्ही या वर्षी प्रांत कार्यालयाच्या प्रांगणातच दिवाळी साजरी करू.
तिथेच लाडू-करंज्या बनवून दिवाळी साजरी करून शासनाच्या उदासीनतेचा निषेध नोंदवू.”

शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन तोडगा काढावा, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular