भिवंडी – वाडा रस्त्यासाठी प्रमोद पवार यांचे आमरण उपोषण सुरू
भिवंडी (30 सप्टेंबर) : वाडा–भिवंडी रस्त्याच्या खड्डेमय दुरवस्थेविरोधात निर्णायक पाऊल उचलत भिवंडी जनआंदोलन समितीचे प्रमुख प्रमोद पवार यांनी आज अंबाडी नाका येथे आमरण उपोषणास सुरुवात केली असून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, ग्रामपंचायती व मान्यवरांचा या उपोषणाला मोठा पाठिंबा मिळत आहे. “2011 पासून अनेक ठेकेदार आले, कोट्यवधी रुपये खर्च झाले, तरी रस्त्याचे काम रखडलेलेच आहे; या रस्त्याने असंख्य जीव घेतले. जनता कर भरते मग चांगला रस्ता मिळणे हा तिचा हक्क नाही का?” असे भावनिक आवाहन पवार यांनी केले.
प्रशासनावर वाढला दबाव
उपोषणाच्या पहिल्याच दिवशी शेकडो महिला, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र येऊन “रस्ता आमचा हक्काचा आहे”, “भ्रष्ट ठेकेदार हद्दपार करा” अशा घोषणांनी वातावरण दणाणून सोडले. भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. गीते यांनी पवार यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, मात्र पवार यांनी “अधीक्षक अभियंता प्रत्यक्ष येऊन भ्रष्ट ठेकेदाराला काळ्या यादीत टाकल्याची घोषणा करेपर्यंत व रस्त्याच्या कामावर ठोस निर्णय घेईपर्यंत उपोषण सुरू राहील” असा ठाम इशारा दिला.कुणबी सेना, ठाणे जिल्हा कोयना संघ, कोकण विभाग पत्रकार संघ, स्वाभिमान संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, भिवंडी ग्रामीण काँग्रेस कमिटी, रावण ग्रुप, माळुंगा ग्रामस्थ मंडळ, देवा ग्रुप फाउंडेशन, आर्यन फाउंडेशन, जिल्हा परिषद सदस्य राजेश मुकणे, महाराष्ट्र बेलदार संघ, शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस नेते, अॅड. दीपक विधाते ग्रुप, भाजप ज्येष्ठ नेते तसेच अनेक ग्रामपंचायती व मान्यवरांनी उपोषणास जाहीर पाठिंबा दिला असून तरुण कार्यकर्त्यांच्या टीमने (सुनील लोणे, कल्पेश जाधव, ॲड. असगर पटेल, रूपेश जाधव, मिलिंद कांबळे, भूषण घोडविंदे, नवनाथ भोये, मुकेश जोशी, मुकेश पाटील, निलेश चव्हाण, महेश ठाकरे, सुशांत चौधरी, सागर न्हानवे, सतीश जाधव) व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली आहे.“आंदोलन हा शेवटचा पर्याय नाही, पण मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही” असे प्रमोद पवार यांनी स्पष्ट केले असून उपोषणाला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता प्रशासनाने तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीबाबत निर्णय घ्यावा, अशी जनतेची ठाम मागणी आहे.








