पालघर दि.१६ : राज्याच्या उद्योग विभागामार्फत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निर्यातदारांना उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या राज्यस्तरीय सोहळ्यात पालघर जिल्ह्यातील तीन निर्यातदार उद्योगांनी एकूण पाच पुरस्कार पटकावून जिल्ह्याचा सन्मान वाढविला. तारापूर एमआयडीसी येथील डी. डेकोर प्रा. लि. या घटकाला होम डेकोर फॅब्रिक निर्यातीसाठी मोठे उद्योग प्रवर्गातून सन 2022-23 साठी सुवर्ण पुरस्कार आणि सन 2023-24 साठी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. वसई येथील सहयोग एक्स्पोर्ट्स प्रा. लि. या घटकास लेदर उत्पादनांच्या निर्यातीसाठी लघुउद्योग प्रवर्गातून सन 2022-23 साठी सुवर्ण पुरस्कार मिळाला. सफाळे येथील अमिटी लेदर इंटरनॅशनल या घटकास लेदर उत्पादनांच्या निर्यातीसाठी लघुउद्योग प्रवर्गातून सन 2022-23 साठी प्रमाणपत्र आणि सन 2023-24 साठी रजत पुरस्कार देण्यात आला.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की,
राज्याच्या निर्यातीचे गुणोत्तर दहा पटीने वाढविण्यासाठी 12 नवीन उद्योग धोरणे येत आहेत. ईव्ही, जीसीसी, बांबू, लेदर, एरोस्पेस आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या क्षेत्रांसाठी स्वतंत्र धोरणे आखली जात आहेत ज्यामुळे उद्योजकांना दिलासा मिळणार आहे.
पालघर जिल्हा निर्यात क्षेत्रात सातत्याने प्रगती करत असून सन 2022-23 मध्ये रु. 27,450 कोटी, सन 2023-24 मध्ये रु. 28,278 कोटी आणि सन 2024-25 मध्ये रु. 30,138 कोटी रुपयांची निर्यात झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड आणि उद्योग सहसंचालिका विजू सिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्ह्यातील निर्यातदार उद्योजकांनी राज्यस्तरीय निर्यात पुरस्कार पटकावल्याबद्दल सर्व उद्योग क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. पालघर जिल्हा आज राज्याच्या औद्योगिक नकाशावर ‘सुवर्ण’ ठसा उमटवत आहे.








