बार्शिटाकळी प्रतिनिधी / राहुल राऊत
अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यात अवैध दारूच्या धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या “ऑपरेशन प्रहार” मोहिमेअंतर्गत बुधवारी बार्शिटाकळी पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत 39,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्राम कोथळी बु. येथे कारवाई
बार्शिटाकळी पोलिसांनी ग्राम कोथळी बु. येथे छापा टाकला असता, अजय भीमराव वरठे (वय 40, रा. कोथळी बु.) याच्या ताब्यातून 210 लिटर सडवा मोहा (किंमत 31,500 रुपये) आणि 40 लिटर हातभट्टी दारू (अंदाजे किंमत 8,000 रुपये) असा एकूण 39,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी बार्शिटाकळी पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या पथकात पी.एस.आय. बोडखे, दशरथ बोरकर, हेड कॉन्स्टेबल गोकुळ चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अन्सार स्वप्नील, तसेच चालक पो.का. मनीष ठाकरे यांनी सहभाग घेतला.
अवैध दारूधंद्यावर पोलिसांचा सततचा अंकुश
बार्शिटाकळी तालुक्यातील अवैध दारूधंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत अशा धडक कारवाया सुरू ठेवल्या आहेत. यामुळे स्थानिक गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत होत आहे.