बोईसर/पालघर, दि.२९ एप्रिल
उमरोळी येथील क्रिकेट मैदानाजवळील वळणावर बुधवारी चारचाकी वाहन व दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडला होता. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती; मात्र जखमीस मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते, अशी दुर्दैवी स्थिती निर्माण झाली होती.
याच वेळी पालघर येथून घरी परतत असताना आपदा मित्र/सखी व नागरी संरक्षण दलाच्या दुर्घटना नियंत्रण अधिकारी प्रिया पाटील यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी तत्काळ वाहन थांबवून परिस्थितीचा आढावा घेतला व विलंब न करता मदतकार्य सुरू केले. आपदा मित्र त्यांच्यासोबत असलेले सहकारी ओमकार नाईक, सानिया संखे, सिमरण संखे व अपेक्षा संखे यांनी एकत्रितपणे जखमीस प्रथमोपचार दिले. जखमीच्या तुटलेल्या पायास आधारफळी लावून त्याला सुरक्षितपणे रिक्षामधून पुढील उपचारासाठी बोईसर येथील टिमा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
या घटनेतून आपदा मित्र व नागरी संरक्षण दलामार्फत दिल्या जाणाऱ्या आपत्कालीन प्रशिक्षणाचा प्रभावी उपयोग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. वेळेवर केलेल्या या धाडसी व मानवतावादी कार्याबद्दल संबंधित सर्व स्वयंसेवक व मास्टर ट्रेनर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.








