Homeक्राईमElectric मोटरने गॅस भरून विक्री; वाड्यात मोठा रॅकेट उघड!

Electric मोटरने गॅस भरून विक्री; वाड्यात मोठा रॅकेट उघड!

गॅस तुटवड्यात काळाबाजाराचा स्फोट; वाड्यात धडक कारवाई!

🛑 वाडा तालुक्यात गॅसचा काळाबाजार उघड; राज्यभर खळबळ

वाडा (जि. पालघर), दि. 27 मार्च 2026 :


पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात घरगुती गॅसचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. राज्यस्तरीय दक्षता पथकाने गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला असून, या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे.

मा. नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पथकाने छापा टाकला. या कारवाईदरम्यान घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरून अवाजवी दराने विक्री केली जात असल्याचे उघड झाले.

तपासात 5 किलो व 14 किलो क्षमतेच्या घरगुती सिलेंडरचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर गॅस भरून विक्री सुरू असल्याचे स्पष्ट झाले. कारवाईदरम्यान 14 किलोचे 91 व 5 किलोचे 75 रिकामे घरगुती गॅस सिलेंडर, व्यावसायिक सिलेंडर, 3 इलेक्ट्रिक मोटर्स तसेच 6 वजन काटे असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी घटनास्थळी आढळून आलेले कामगार धनराज माखणे, कैलास राठोड व प्रवीण पवार यांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत त्यांनी देवा पवार हा या बेकायदेशीर व्यवसायाचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती दिली. संबंधित व्यक्ती त्यांना दरमहा सुमारे 15 हजार रुपये मानधन देऊन गॅस भरण्याचे काम करून घेत असल्याचे उघड झाले आहे.

ही कारवाई मुसारणे येथील मालकीच्या जागेत सुरू असलेल्या बेकायदेशीर गॅस व्यवसायावर करण्यात आली. या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 तसेच तरल पेट्रोलियम गॅस (LPG) आदेश 2000 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि भगवंत चौधरी करत आहेत.

दरम्यान, गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर असा प्रकार उघड झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular