HomeBlogदिवाळीत घरफोडीपासून सावधान! वाडा पोलीस ठाण्याचे नागरिकांना आवाहन

दिवाळीत घरफोडीपासून सावधान! वाडा पोलीस ठाण्याचे नागरिकांना आवाहन

वाडा प्रतिनिधी / दि.१६

दिवाळीचा उत्सव जवळ येत असताना नागरिक खरेदी, प्रवास व नातलग भेटीच्या तयारीत व्यस्त असतात. अशा काळात अनेक घरे रिकामी राहतात आणि चोरट्यांसाठी तीच संधी ठरते. त्यामुळे वाडा पोलीस ठाण्याने नागरिकांना घरफोडीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

घर सोडताना दरवाजे, खिडक्या व ग्रील नीट बंद ठेवावेत, मुख्य दरवाजाला मजबूत कुलूप लावावे, तसेच जास्त रोकड वा दागिने घरात न ठेवता बँक लॉकर वापरावा, असे पोलिसांनी सांगितले. घरात कोणी असल्याचा भास निर्माण होण्यासाठी काही दिवे चालू ठेवावेत आणि प्रवासाला जाताना विश्वासू शेजाऱ्यांना माहिती द्यावी.

सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचेही आवाहन पोलिसांनी केले आहे. CCTV कॅमेरे, मोशन सेन्सर लाइट्स, व्हिडिओ डोअरबेल किंवा स्मार्ट लॉक बसवावेत आणि फुटेजचा नियमित बॅकअप घ्यावा. मोबाईल अॅपद्वारे घराच्या सुरक्षा प्रणालीवर लक्ष ठेवावे.

संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, नाईट पेट्रोलिंग आणि “Neighbourhood Watch” प्रणाली सक्रिय ठेवावी, तसेच सोशल मीडियावर प्रवासाची माहिती शेअर करणे टाळावे, असे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांक 112 वर संपर्क साधावा.
वाडा पोलिसांनी नागरिकांना संदेश दिला आहे — “सावधान रहा, सुरक्षित राहा आणि दिवाळीचा सण आनंदाने साजरा करा!”

RELATED ARTICLES

Most Popular