२७ ते ३० सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा; प्रशासनाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

0
1044

२७ ते ३० सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा; प्रशासनाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई/प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने (SEOC, मंत्रालय) भारतीय हवामान विभागाकडून (IMD) मिळालेल्या माहितीनुसार २७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये व्यापक पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

धोक्याची शक्यता असलेले भाग :
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत जोरदार पावसामुळे शहरी पुराचा धोका असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच घाट परिसर व लहान नद्यांच्या काठावरील गावांमध्ये भूस्खलन व अचानक पूर (Flash Flood) येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनासाठी निर्देश :
सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्ष २४x७ कार्यरत ठेवावेत. शहरी भागांतील पाणी उपसा पंप नीट कार्यरत असल्याची खात्री करावी. धोकादायक आणि जुन्या इमारतींची तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करावी. नदीकाठ व धरण परिसरात नागरिकांची वावरावर लक्ष ठेवावे आणि आवश्यक ती सूचना लावाव्यात. रस्ते आणि पूलावरील तात्पुरत्या पाट्यांद्वारे वाहतूक सुरक्षेची काळजी घ्यावी.

प्रशासनाची तयारी :
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला तयार ठेवण्यात आले असून, पूरग्रस्त किंवा अडचणीत आलेल्या भागात तातडीने मदत पोहोचवण्यासाठी सर्व पथके सज्ज असल्याचे शासनाने कळवले आहे.

नागरिकांसाठी सार्वजनिक आवाहन :
राज्य शासनाने सर्वसामान्य नागरिकांना हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. धोकादायक भागात जाणे टाळावे, अनावश्यक प्रवास करू नये आणि पुरग्रस्त भागापासून दूर रहावे. तसेच एसएमएस, सोशल मीडिया व स्थानिक माध्यमांतून मिळणाऱ्या इशाऱ्यांवर लक्ष ठेवून सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here