वाडा/प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन, गृह विभाग (विशेष) यांच्या वतीने नागरी संरक्षण दल, जिल्हा पालघर तर्फे आयोजित “नागरी संरक्षण मूलभूत प्रशिक्षण व आपत्ती व्यवस्थापन” या पाच दिवसीय शिबिराची यशस्वी सांगता झाली. वाडा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड सायन्स येथे १६ ते २० सप्टेंबरदरम्यान हे प्रशिक्षण पार पडले.
या प्रशिक्षणात स्वयंसेवकांना प्रथमोपचार, सीपीआर, आग नियंत्रण, शोध व सुटका, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन, सर्पदंश उपचार, बॉम्ब संरचना व परिणाम तसेच आण्विक-जैविक-रासायनिक युद्ध संकल्पना या महत्त्वपूर्ण विषयांवर सैद्धांतिक व प्रात्यक्षिक मार्गदर्शन देण्यात आले.
शिबिरात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांना शासनमान्य ओळखपत्र, प्रमाणपत्र, मानधन तसेच राज्य व केंद्रस्तरीय प्रगत प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग या उपक्रमाला मिळाला असून, वाडा तालुक्यात सजग व जबाबदार नागरिक घडविण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
समारोप कार्यक्रमास वाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. किंद्रे उपस्थित होते. त्यांनी सायबर गुन्ह्यांचे प्रकार, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) परिणाम आणि त्यापासून सुरक्षित राहण्याचे मार्ग याबाबत मार्गदर्शन केले.
या वेळी नागरी संरक्षण दलाचे विभागीय क्षेत्ररक्षक भूपेंद्र मिश्रा, कॉलेजच्या प्राचार्या ममता पाटील, शिक्षकवर्ग तसेच सुनालको कंपनीचे व्यवस्थापक उपस्थित होते.
शिबिराचे आयोजन जिल्हा उपनियंत्रक काशिनाथ कुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली, विभागीय क्षेत्ररक्षक भूपेंद्र मिश्रा आणि स्वयंसेवक डॉ. दिपेश पष्टे यांच्या पुढाकारातून करण्यात आले.








