वाडा | प्रतिनिधी
ह.वि. पाटील हायस्कूल, चिंचघर येथे सखी सावित्री समितीच्या वतीने विद्यार्थी व पालकांसाठी कायदेविषयक व सुरक्षा मार्गदर्शन सत्र उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात वाढती आव्हाने लक्षात घेता हे सत्र अत्यंत मार्गदर्शक ठरले.
हा कार्यक्रम नागरी संरक्षण दल, तारापूर चे उपनियंत्रक काशिनाथ कुरकुटे तसेच विभागीय क्षेत्ररक्षक (वाडा) भूपेंद्र मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी डॉ. दिपेश पष्टे (संचालक – आपले मानवाधिकार फाउंडेशन, स्वयंसेवक/मास्टर ट्रेनर – नागरी संरक्षण दल, महाराष्ट्र शासन गृह विभाग विशेष, स्वयंसेवक – राष्ट्रीय सायबर गुन्हे, शिव संविधान व्याख्याते व समुपदेशक) यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक संदेश पाटील तसेच शाळेतील शिक्षकवर्ग उपस्थित होता.
डॉ. पष्टे यांनी आपल्या मार्गदर्शनात गुन्हेगारी कशी घडते, त्यामागील मानसिकता, तसेच गुन्हे घडू नयेत यासाठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी कोणती खबरदारी घ्यावी यावर सविस्तर माहिती दिली. परिसरात घडलेल्या काही वास्तविक घटनांचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
सत्रात विद्यार्थी सुरक्षितता, शालेय कायदे, सायबर सुरक्षा, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, सायबर फसवणूक, बालकांचे हक्क, पालकांची जबाबदारी तसेच POCSO कायद्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती प्रभावीपणे मांडण्यात आली. विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेबाबत कायदेशीर तरतुदी, आदर व समानतेचे महत्त्व यावर भर देण्यात आला.
या मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये कायदेविषयक जागरूकता वाढली असून, सुरक्षित व सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.








