बार्शिटाकळी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान; राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून तहसीलदारांना निवेदन

तालुका प्रतिनिधी /राहुल राऊत

बार्शिटाकळीबार्शिटाकळी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उभी पिके पाण्यात बुडून नष्ट झाली असून शेतकऱ्यांचे हातचे पीक पाण्याच्या प्रकोपामुळे वाया गेले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्या कुटुंबांवर उदरनिर्वाहाचे मोठे संकट कोसळले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून पुढाकार

या गंभीर परिस्थितीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. निवेदनात शासनामार्फत तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच बार्शिटाकळी तालुका व परिसर ‘ओला दुष्काळग्रस्त’ घोषित करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी ठाम भूमिका पक्षाने मांडली.

शेतकऱ्यांच्या अडचणी गंभीर

शेती हीच उपजीविका असलेल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दुसरा पर्याय नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन तात्काळ मदत जाहीर केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे देण्यात आला आहे.

निवेदनावेळी मोठी उपस्थिती

निवेदन देताना अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ. बिस्मिल्ला खान, सरफराज खान, तालुकाध्यक्ष सतीश पाटील गावंडे, शहराध्यक्ष अय्याज खान, गोपालराव कटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही झाली.या प्रसंगी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. तहसीलदारांनी निवेदन स्वीकारून शासनाकडे तातडीने पाठवण्याचे आश्वासन दिले.निवेदन देताना अविनाश डोंगरदिवे, सलीमुद्दीन शेख, मोहम्मद समीर, गोहर, आली खान यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here