वाडा प्रतिनिधी :
कोहोज किल्ला पायथ्याशी वसलेल्या नाणे (ता. वाडा) येथे कृष्णांग सेवाभावी क्रांती संस्थेतर्फे छत्रपती शिवजयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात परिसरातील तब्बल ४३ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. रक्तदानाच्या माध्यमातून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडत नागरिकांनी मानवतेचा संदेश दिला. साथिया ब्लड ट्रस्ट, नालासोपारा यांच्या सौजन्याने हा उपक्रम पार पडला. संस्थेचे प्रणेते क्रांतीसेवक नितीन वासुदेव पाटील तसेच क्रांतीदूत सहकाऱ्यांच्या पुढाकारातून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
शिवजयंतीपूर्वी मंगळवारी संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गावातील गल्लीबोळ तसेच तोफ परिसर स्वच्छ करण्यात आला. ग्रामस्थांनी सडा-रांगोळी काढून परिसर आकर्षक सजविला. गुरुवारी (दि. १९ फेब्रुवारी) सकाळी तोफेचे पूजन करून हनुमान मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सायंकाळी शिवपूजनानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. “शिवगर्जना”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाच्या शेवटी काश्मीर येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रभक्तीपर वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.








