Homeक्राईमहोळी बंदोबस्तादरम्यान वाहतूक पोलिसावर हल्ला; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

होळी बंदोबस्तादरम्यान वाहतूक पोलिसावर हल्ला; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

भिवंडी प्रतिनिधी

होळीच्या बंदोबस्तादरम्यान भिवंडी शहरात वाहतुकीचे नियमन करत असताना पोलीस हवालदारावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी एका तरुणाविरुद्ध भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहर वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार रमेश पाटोळे (वय ५४) हे होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तावर तैनात होते. यावेळी दोन तरुणांमध्ये वाद सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि वाद सोडवण्यासाठी ते मध्यस्थी करण्यासाठी पुढे गेले असता, त्यापैकी एका तरुणाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला.

आरोपीने पाटोळे यांचा गळा दाबून मारहाण केली तसेच शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर तत्काळ इतर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.या प्रकरणी इम्रान इद्रिस सिद्दीकी (वय २०) याच्याविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांवर हल्ल्याची घटना चिंताजनक मानली जात असून नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular