Homeक्राईमभिवंडी–वाडा महामार्गावर ईगल कंपनीचा नियोजनशून्य कारभार; अपघातांची मालिका सुरूच

भिवंडी–वाडा महामार्गावर ईगल कंपनीचा नियोजनशून्य कारभार; अपघातांची मालिका सुरूच

भिवंडी / वाडा

अनेक वर्षांपासून रखडलेल्या भिवंडी-वाडा महामार्गाच्या कामासाठी सुमारे ९०० कोटी रुपयांचा ठेका दोन वर्षांपूर्वी Eagle Infrastructure या कंपनीला देण्यात आला होता. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित रस्ता मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र प्रत्यक्षात कामाच्या संथ गतीमुळे आणि नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून दररोज अपघातांची मालिका सुरू आहे. अनेकांनी या रस्त्यावर आपले प्राण गमावले असून काही जण गंभीर जखमी होऊन कायमचे अपंग झाले आहेत.

रस्त्याच्या कामादरम्यान आवश्यक दिशादर्शक फलक, सुरक्षा सूचना किंवा पर्यायी वाहतूक व्यवस्था कुठेही दिसून येत नसल्याने वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी अर्धवट काम सोडून दिल्यामुळे अवजड वाहनांच्या लांबलचक रांगा लागत असून वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या कुडूस गावात अतिक्रमणाचा प्रश्न आधीच गंभीर असताना मागील पंधरा दिवसांपासून रस्त्याची एक बाजू खोदून ठेवण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला मोठमोठे खड्डे तसेच रस्त्यालगत दुकाने असल्यामुळे नागरिक व वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. ही बाब वारंवार कंपनीच्या निदर्शनास आणून देऊनही खड्डे बुजविणे किंवा पर्यायी व्यवस्था करण्याबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

नियोजनशून्य कारभारामुळे आणखी किती नागरिकांना जीव गमवावा लागणार, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कामाचा वेग वाढवावा व सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular